नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भोसरी प्रकरणातून अद्यापही त्यांची सुटका झाली आहे. त्यानंतर जळगाव दूध संघाच्या प्रकरणात ते अडचणीत आले. आता आणखी एका प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकरणात ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यांवर आहे.
नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयाने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करताना अनियमितता झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता. तसेच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही करण्यात आला होता.
नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना खडसे यांच्यांविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
















