मुंबई(प्रतिनिधी)-अनाथांच्या प्रश्नांचे उत्तर म्हणून ‘तर्पण’ उभी आहे. अनाथांचा आनंद हाच आपला प्राण, असे समजून कार्यकर्त्यांनी एक आनंदयात्री म्हणून काम करावे. अठरा वर्षावरील अनाथ मुलांच्या पंखात बळ देण्यासाठी ईश्वरी शक्तीनेच आपली निवड केली असावी अशी भावना व्यक्त करत सर्व संचालकांनी अनाथांच्या जीवनात आनंद पेरावा असे आवाहन आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले. दोन वर्षात लोकांच्या सहभागातून तर्पणने शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी अनाथ विद्यार्थ्यांसाठी 96 लाख रुपयांची फीस भरली. यातुन मुलांचे शैक्षणिक आणि सामाजिक पुनर्वसन होईल अशी आशा व्यक्त केली.
महाराष्ट्रात अठरा वर्षावरील अनाथ मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मागील दोन वर्षांपासून तर्पणच्या माध्यमातून काम केले जात आहे. राज्यभरातील तर्पणच्या संचालक आणि कार्यकर्त्यांची तीन दिवसीय कार्यशाळा रामभाऊ महाळंगी प्रबोधनीत पार पडली. अनाथांसाठीच्या दोन वर्षातील कामाचे सिंहावलोकन करताना तर्पण चे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय यांनी समाजात अनाथ मुलांचे प्रश्न आहेत म्हणून संस्था जन्माला आली नाही तर या प्रश्नांचे उत्तर म्हणून काम करत आहे. आपले काम प्रामाणिक असेल तर समाज आणि शासन सुध्दा भक्कमपणे पाठीशी उभा राहू शकतो. याचा प्रत्यय आला. दोन वर्षात अठरा वर्षापुढील अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तब्बल 96 लाख रुपयांची फीस भरली आहे.
समाजातील दानशुरांनी विश्वासाने मदत केल्यामुळेच हे काम पूर्ण होऊ शकले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील उद्देशाचा संदर्भ देऊन भारतीय यांनी अनाथांचे काम करण्यासाठी ईश्वरानेच आपली निवड केली असावी. त्यामुळे अनाथांच्या जीवनात आनंद हेच तर्पण चा प्राण आहे.
त्यामुळे संस्थेत सेवाभावी वृत्तीने काम करणार्या राज्यभरातील संचालक आणि कार्यकर्त्यांनी एक आनंदयात्री म्हणून अनाथांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी मनोभावे सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आपल्यातील क्षमता ओळखून अधिक जोमाने अनाथांसाठी काम केल्यास या मुलांच्या सामाजिक पुनर्वसनाला अधिक बळ मिळणार आहे. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेसाठी राज्यभरातील संचालक, कार्यकर्ते, मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, बालविकास विभागाच्या सचिव आर.विमला, रविंद्र संगवी, दिलीप पोरवाल यांनीही वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. तर्पणच्या कामात अग्रेसर असलेल्या श्रेयाताई भारतीय यांच्या पसायदानाने या तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.