अहमदाबाद – स्वयंघोषित संत आसाराम बापूला आणखी एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००१-०६ या पाच वर्षांच्या कालावधीत आसारामच्या आश्रमात असलेल्या दोन बहिणींवर आसारामने सातत्याने बलात्कार केला होता. याप्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला. त्यामुळे तब्बल २३ वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला आहे.
२००१ ते २००६ या पाच वर्षांच्या कालावधीत आसाराम बापूने सूरत येथे राहणाऱ्या महिला शिष्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी ऑक्टोबर २०१३ मध्ये आसाराम बापूसह सात जणांवर बलात्कार आणि अवैधरित्या बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. तर, २०१४ मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणी सरकारी वकील आर.सी.कोडेकर यांनी सोमवारी म्हटलं की, न्यायालयाने या खटल्याप्रकरणी आसाराम बापूला भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (सी), ३७७ (अप्राकृतिक यौनाचार) आणि अवैध रुपाने बंदिस्त ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
कोण आहे आसाराम बापू
आसाराम बापूला कधीकळी आध्यात्मिक गुरू म्हणून लोकमान्यता मिळाली होती. देशभरात त्याचे असंख्य भक्त होते. आसुमल थाऊमल सिरुमलानी असं त्याचं खरं नाव आहे. आसाराम बापू याचा जन्म सिंध प्रांतातील नवाब जिल्ह्यातील बेरानी या लहानशा खेड्यात झाला. त्याच्या जन्मावेळी एका पाळण्यावाल्याला साक्षात्कार झाला होता. या गावात कोणीतरी संत जन्म घेणार असल्याचा तो साक्षात्कार होता. तेव्हापासून आसाराम बापूची अख्यायिका सांगितली जाते. मात्र, त्याने अनेकींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले आहेत.