मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण प्रलंबित आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या युक्तीवादानंतर या प्रकणावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
शिवसेनेतील निष्ठावान समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी पक्षाविरोधात बंड केला आणि बघता बघता अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात सामील झाले. त्यानंतर राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात सत्तापालट झाला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासूनच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे.
आज सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला. युक्तीवादादरम्यान सिब्बल यांनी मागच्या सुनावणी वेळी करण्यात आलेल्या युक्तीवादाचा दाखला दिला. गेल्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावं, अशी विनंती केल्याची आठवणही सिब्बल यांनी खंडपीठाला करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचं मत घेऊन ही सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचं जाहीर केलं.