धानवड, ता. जळगाव, (वार्ताहर)- येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे बाला उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक दिनांक २४ रोजी प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव तालुक्यातील काही शाळांचा बाला उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्या- पैकी एक धानवड शाळा असून बाला उपक्रमांतर्गत मागील वर्षापासुनच शाळेत कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या विकास कामांना गती देण्यासाठी या प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, विस्तार अधिकारी खलिल शेख, श्रीमती प्रतिमा सानप, केंद्रप्रमुख श्रीमती अनिता परमार उपस्थित होत्या. गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक आणि बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते.
बाला उपक्रमातील 43 मुद्दयांची पूर्तता करण्यासाठी आतापर्यंत शाळेला सुमारे 16 हजार रूपये मिळाले असून त्यातून काही कामांना सुरुवात झाली आहे. आजच्या सभेतही ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 52000 रुपयांची देणगी जाहीर केली आहे. लोकसहभागाचे 90000 रुपयांचे उपक्रमाचे उद्दीष्ट आम्ही लवकरच पूर्ण करू असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच श्री. संभाजी पवार यांनी भूषविले. व्यासपीठावर शिवराज भाऊ पाटील, दिलीप चव्हाण, भूषण पाटील, हरीलाल शिंदे हे मान्यवर सुद्धा उपस्थित होते.