जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष आधीष्ठाता डॉ. रामानंद यांची बदली झाली असून नूतन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर हे सोमवार दिनांक २८ रोजी पदभार स्वीकारणार असल्याच ‘नजरकैद’ बोलतांना सांगितलं आहे. डॉ. गिरीष ठाकूर हे मूळचे लातूर वैद्यकीय महाविद्यालयातील असून सध्या ते अलिबाग येथे उप अधिष्ठाता म्हणून सेवेत आहेत . ते कान नाक घसा शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. जळगाव अधिष्ठाता पदाचा पदभार घेतल्यावर त्यांच्यासमोर समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे.
महाविद्यालय रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य खात्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशावरून त्यांच्या मूळ पदस्थापनेवर नियुक्ती केली आहे. तर अलिबाग येथे असलेले उप अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तात्काळ पदभार सुपूर्द करण्याबाबत डॉ. रामानंद यांना आदेश करण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीच्या कठीण काळात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा भार सांभाळला होता. अगदी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कारभार करत रुग्ण व नातेवाईकांना त्यांनी आपलेसे केले होते. या रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांचे रुग्णालयात येण्याचे प्रमाण वाढले होते.
सुरुवातीला १३ जून २०२० ला रुजू झाल्यानंतर डॉ.रामानंद यांच्याकडून ७ सप्टेंबर २०२१ रोजी पदभार काढून घेत डॉ. फुलपाटील यांच्याकडे देण्यात आला होता. तिनच महिन्यात रुग्णालयाचा कारभार ढासळल्यामुळे त्यानंतर परत ३१ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाने अधिष्ठाता पदाचा कार्यभार सुपूर्द केला होता. डॉ. रामानंद यांनी रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा शिस्तबद्ध करीत डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले होते.