जळगाव,(प्रतिनिधी)- मी कधीही गिरीश महाजन यांच्या मुलाबाळांविषयी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही, माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा असल्याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील ‘वाद’ सर्वश्रुत असून अनेकदा यांच्यातील वादाची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगताना दिसते मात्र आज Girish Mahajan यांनी Eknath Khadse यांना मोठा इशारा दिल्याने पुन्हा जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा नेते गिरीष महाजन यांनी मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी इशारा दिला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की,मी केवळ म्हणालो होतो की, त्यांना मुलगा राहिला असता तर त्यांनीही त्याला राजकारणात आणले असते. मात्र, दुर्दैवाने त्यांना मुलगा नाही. माझ्या मुलाबद्दल वक्तव्य करून संशय निर्माण केला जात आहे. त्यांनी सीबीआयद्वारे चौकशी करावी, मात्र अशाप्रकारे कोणाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करायला नको.
गिरीश महाजन यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य हे रक्षाताईंबाबत संशय व्यक्त करणारे आहे. ते सत्ताधारी असून सर्व तपास यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. त्यांनी या प्रकरणाची खुशाल चौकशी करावी असे आव्हान देखील आमदार खडसे यांनी केले. तर, या प्रकारचे वक्तव्य म्हणजे गिरीश महाजन यांची सत्तेची मस्ती आणि माज असल्याची शेलकी टीका त्यांनी केली. हा नीच आणि हलकटपणाचा कळस असल्याचेही ते म्हणाले. आम्हालाही माहिती आहे की फर्दापूरच्या रेस्ट हाउसमध्ये काय घडले. गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली असल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे.