भिलवाडा : महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस ही प्रमाण वाढतच असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच राजस्थानच्या भिलवाडामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरात एका तरुणाने एका तरुणीला तिच्या भावाच्या अपघाताची खोटी बातमी सांगून तिला गाडीवर बसवलं. त्यानंतर अज्ञातस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर बलात्कारानंतर आरोपीने तरुणीला दोन मजली इमारतीवरून खाली फेकून दिलं. ही संतापजनक घटना राजस्थानच्या भीलवाडा शहरात घडली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. इरफान असं आरोपी तरुणाचं नाव असून त्याच्याविरोधात २२ वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडिता बाजारात जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा इरफान नामक तरुण तिच्याजवळ आला.
तुझ्या भावाचा अपघात झाला असून तुला तातडीने रुग्णालयात बोलावलं आहे, असा बहाना बनवत इरफानने पीडित तरुणीला गाडीवर बसवलं. त्यानंतर आरोपीने भरधाव वेगात गाडी सुभाषनगरमध्ये नेली. तेथे गेल्यानंतर पीडितेने माझा भाऊ कुठे? अशी विचारणा इरफानकडे केली.
यावर उत्तर देत तुझ्या भावाला सुट्टी मिळाली असून त्याला वरील रुममध्ये ठेवलं असल्याचं आरोपीने सांगितलं. दरम्यान, तरुणी रूममध्ये गेली असता, इरफानने पीडितेवर सलग दोन वेळा अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार केला असता, त्याने तिला मारहाणही केली. तरुणीने आरडाओरड केली असता, आरोपीने तिला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं.
या घटनेत तरुणीच्या पायाला आणि कंबरेला जखमही झाली आहे. परिसरातील नागरिकांनी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, ती आरोपींना आधी ओळखत नव्हती. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी इरफान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.