मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तब्बल ११ महिन्यानंतर अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 100 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर आठवडाभरात सुनावणी घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयात अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्याचवेळी आज त्यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयने त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात ते कोठडीतच राहणार आहेत. अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती आणि विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांचा जामीन अर्ज जवळपास 8 महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित होता. यानंतर २६ सप्टेंबर रोजी अनिल देशमुख यांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज प्रलंबित ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.