मुंबई : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास महाराष्ट्रात १४-१४-१४ असा सत्तावाटपाचा फॉर्म्युला असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील तर काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल, असंही सांगण्यात येत आहे. या फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस नेतृत्व आग्रही असल्याचंही सांगण्यात येत आहे.
वैचारिक मतभेद बाजूला सारून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर ‘समान किमान कार्यक्रम’ निश्चित करू तिन्ही पक्षांना महाराष्ट्रातील सरकारचा कारभार हाकावा लागणार आहे. या सरकारचं नेतृत्व अर्थातच सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे असणार हे स्पष्ट असलं तरी हे आव्हान फार मोठं असणार आहे.
सत्तास्थापन होण्याआधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अटी पुढे केल्या जाऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होणार असेल तर १४-१४-१४ अशी मंत्रिपदांची समान विभागणी तिन्ही पक्षांमध्ये व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून दोन उपमुख्यमंत्री असतील, अशाप्रकारचा प्रस्ताव काँग्रेसने शिवसेनेपुढे ठेवण्याचे निश्चित केल्याचेही सांगण्यात येत आहे.