पणजी : महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे 11 पैकी 10 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. आज गोव्यातील राजकीय हालचाली गतीमान होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून आज सायंकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य 9 काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.