इंदौर : तीन मजली इमारतीला भीषण आग लागून यात या इमारतीत राहणाऱ्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ८ जण गंभीररित्या भाजले आहेत. ही घटना इंदौरमधील विजय नगरच्या स्वर्णबाग नगरमध्ये रात्री घडलीय. यातील सर्व जखमींना एमवाय हॉस्पटलमध्ये भरती करण्यात आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रात्री अचानक इमारतीतून धूर निघू लागला. लोकांना काही समजण्याच्या आत आगीने रौद्ररुप धारण केले. शेजारच्या लोकांनी याची माहिती फायर ब्रिगेडला दिली. जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळविले,परंतू तोवर खूप उशीर झाला होता. इमारतीतील ७ जणांचा मृत्यू झाला होता.
आगीची सूचना मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले. त्यांनी आगीच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच आजुबाजुच्या घरांतील लोक रस्त्यावर आले होते. आगीमुळे शेजाऱ्यांना कोणते नुकसान झालेले नाही.