मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी राडा घातल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर आंदोलन करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना आधीच होती असा खुलासा गुणरत्न सदावर्तेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या एफआयआरमधून समोर आले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी धुडगूस घातला होता. ७ एप्रिल रोजी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसंच प्रसार माध्यमांशी बोलत असताना “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता. त्यानुसार पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंना अटक केली आहे.
सदावर्तेंच्या विरोधात दाखल गुन्ह्यातील एफआयआरमध्ये पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एसटी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. सदर आंदोलनाच्या अनुशंगाने काही व्यक्तींच्या चिथावणीनुसार एसटी कर्मचारी हे विविध राजकिय पक्षांची नेते, खासदार, आमदार व मंत्री यांच्या निवासस्थानी सुध्दा आंदोलन करतील अषा आषयाचे गोपनीय माहिती प्राप्त होत असे. त्या अनुषंगाने गांवदेवी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये राष्ट्रवादी काग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार यांचे सिल्वर ओक इस्टेट, भुलाभाई देसाई रोड, मुंबई या ठिकाणी निवासस्थान असून, तेथे तसेच इतर रायल स्टोन या मंत्रीमहोदयांचे निवासस्थानी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येत होता.
शरद पवारांच्या घरी आंदोलक येऊ शकतात अशी माहिती मिळाल्याने, साधारण दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावदेवी मोबाईल – १ व इतर पोलीस अंमलदारासह बी.डी. रोडकडून सिल्वर ओककडे जाणाया रस्त्यावरती तैनात करण्यात आले होते असं एफआयआरमध्ये म्हटल आहे. तसेच आंदोलनकर्ते आल्यास त्यांना रोखता यावे याकरीता त्याठिकाणी बरिकेटींग करण्यात आली होती असेही पोलिसांनी म्हटल आहे. त्यामुळे जर पोलीस असताना आंदोलक आतमध्ये कसे घुसले असाही प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.