मुंबई : देशात महागाई उच्चांक गाठू लागली आहे. दिवसेंदिवस महागाईने वाढत चालल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडली गेलीय. मागील काही काळापासून स्थिर असलेला पेट्रोल आणि डिझेल दर देखील आता पुन्हा उच्चांक गाठू लागले आहे. यामुळे सरकारला देशातल्या जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. मात्र सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांनी या दरवाढीचं समर्थन केलं आहे. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश होतो.
गडकरींनी गेल्या चार दिवसांत तीन वेळा झालेल्या इंधन दरवाढीचं समर्थन केलं आहे. ‘रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती भारत सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे,’ असं त्यांनी शुक्रवारी (25 मार्च) सांगितलं.
‘एबीपी नेटवर्क’च्या ‘आयडियाज ऑफ इंडिया’ (Ideas of India) परिषदेत ‘न्यू इंडिया, न्यू मेनिफेस्टो – सबका साथ, सबका विकास’ या सत्रात गडकरी बोलत होते. ही परिषद मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘भारतात 80 टक्के कच्चं तेल आयात केलं जातं. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या (Crude Oil) किमती वाढल्या आहेत. आम्ही त्यामध्ये काहीही करू शकत नाही.’