जळगाव दि. १४ : लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जळगावकरांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवत सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविले. यानिमित्ताने सेवा आणि सदाचाराने भरलेला एक असाही रविवार जळगावकरांनी अनुभवला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद आमदार चंदूभाई पटेल, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी विधान परिषद आमदार गुरुमुख जगवाणी, माजी महापौर विष्णू भंगाळे, ज्येष्ठ कार्यकर्त्या विजया मलारा, मिस मल्टीनॅशनल तन्वी मल्हारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आय.आर.एस. अधिकारी डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

यावर्षी हेल्प फेअर मध्ये एकूण ६० समाजसेवी संस्था व २६ सेवामहर्षी सहभागी झाले आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच यावर्षी शासकीय योजनांची, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात सामाविष्ट करण्यात आले आहे. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांनी सेवाभावी संस्थांच्या स्टॉल्सला भेट दिली व त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. यानंतर त्यांचे स्वागत देखील एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. एखाद्या मंदिरात प्रवेश करावा यारीतीने घंटानाद करून त्यांना मंचावर बोलवण्यात आले, त्याचवेळी एलईडी स्क्रीनवर ज्येष्ठ सेवामूर्तींना देवाच्या स्वरूपात दाखवून एक अनोखा संदेश यावेळी देण्यात आला. यानंतर मंचावर स्थानबद्ध झाल्यावर सर्वांना हेल्प-फेअरचा परिचय देणारी फिल्म दाखवण्यात आली. मल्हार कम्युनिकेशन्सचे आनंद मल्हारा यांनी प्रस्तावना केली तर हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर सेवामहर्षी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ज्यात काल एकूण ९ सेवाव्रतींना सन्मानित करण्यात आले.

एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते तर दुसरीकडे खाद्यजत्रेचा आनंद जळगावकर लुटत होते. आलेल्या पाहुण्यांचा उत्साह पाहता हेल्प-फेअरला खरोखरच एका जत्रेचे स्वरूप मिळाले होते. मानवतेच्या या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीतजास्त नागरिकांनी हजेरी लावून एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअर टीम तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यातून तरूणांना मिळाली नवी दिशा
हेल्प फेअर-४ च्या दुसऱ्या दिवशी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील टाटा कंपनी आणि मल्हार हेल्प फेअर टीम यांच्या प्रयत्नातून आयोजित या रोजगार मेळाव्यात तरूणांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला. आलेल्या उमेदवारांपैकी एकूण ४५ उमेदवारांना टाटा कंपनीतर्फे निवड होऊन त्यांना तत्क्षणी नियुक्तीपत्र देण्यात आले. विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांपैकी १४ उमेदवार मुली आहेत. हेल्प फेअरच्या या प्रयत्नातून समाजाला एक आदर्श संदेश मिळाला आहे हे नक्कीच.
समाजाला बळ देणाऱ्या सेवामहर्षींचा सन्मान
निस्वार्थ भावनेने समाजाला सेवाकार्याच्या माध्यमातून प्रबळ बनवणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव व्हावा यासाठी यंदा प्रथमच सेवामहर्षी पुरस्कार हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात एकूण १९ सेवामहर्षींना सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये पहिल्या दिवशी किशोर सुर्यवंशी, अल्ताफ शेख, अजय कामळस्कर, नामदेव वंजारी, प्रमोद झंवर, अनिल अत्रे, रतन बारी, मुरलीधर लुले तर दुसऱ्या दिवशी पुष्पा भंडारी, राजेश वारके, ललिता व डॉ. सुरेश अग्रवाल, संग्रामसिंह सूर्यवंशी, दमितसिंह ग्रोव्हर, दर्शन सुरतवाला, स्व. मेठीदेवी तलरेजा, दीपक परदेशी साधु कलवाणी या सेवामहर्षींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हेल्प फेअर हा एक आदर्श उपक्रम आहे – डॉ. उज्वलकुमार चव्हाण
दुसऱ्या दिवसाचे प्रमुख वक्ते आय.आर.एस. अधिकारी डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी संवाद साधतांना आपले अनुभव सांगितले. अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना मनुष्य या नात्याने देखील समाजाचे देणे लागतो याचे भान मला होते. यानंतर अनेक प्रयत्नातून मी जनजागृती करण्यात यशस्वी झालो. तेव्हापासून मी जल संसाधन व संधारण यासाठी कार्यरत आहे. समाजासाठी काहीतरी करणे हे एक अवघड काम आहे व हेल्प फेअर म्हणजे अशा काम करणाऱ्या संस्थांना बळ देणारं एक व्यासपीठ. गरजू व दानशूरांना एकत्र आणणारी ही आगळीवेगळी संकल्पना खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हेल्प फेअर-४ मध्ये कार्यशाळेचा आज दुसरा दिवस
हेल्प-फेअर सेवाभावी संस्थांसाठी अधिकाधिक फायदेशीर ठरावे या अनुषंगाने यामध्ये अनेक उपक्रम राबविले जातात आणि त्यापैकी एक म्हणजे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन. यंदा देखील १३ व १४ मार्च रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून आज सकाळी १० ते १ या वेळेत ‘स्वयंसेवी संस्थांसाठी प्रसार माध्यमांचा प्रभावी उपयोग’ या विषयावर मुंबई येथील सर्जना मिडीयाचे सीईओ मिलिंद अरोडकर सेवाभावी संस्थांचे मार्गदर्शन करणार आहेत.
















