जळगाव(प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्थानकावर ट्रेन मध्ये चढत असतांना पायऱ्यांवरून एका महिलेचा पाय निसटला असतांना रेल्वेच्या व प्लॅटफॉर्मच्या मधील भागात खाली पडत असतांनाच दिनेश बडगुजर यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखुन आपला जीव धोक्यात घालुन सदर महिलेला प्लॅटफॉर्मवर ओढुन महिलेचा प्राण वाचविला आहे.दिनेश बडगुजर यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे व धैर्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला असुन त्यांच्या या अतिउत्कृष्ट कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री विठ्ठल ससे व जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बाबासाहेब ठोंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांनी त्यांचे कौतूक करून त्यांचा सन्मान केला आहे.
काय आहे घटना….
रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार श्री अनिल वर्मा व स्टेशनवरील सामानाची ने-आण करणारे श्री सईद पिंजारी यांनी कथन केली आहे. दिनांक 15/02/2022 रोजी सायंकाळी सुमारे 07.00 ते 07.30 वा. चे दरम्यान पुणेकडे जाणारी गाडी नं (11040 अप) गोंदीया कोल्हापुर महाराष्ट्र एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आली नेहमी प्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होती. सर्व प्रवाशी आपआपल्या बोगीत स्थानापन्न झाल्यानंतर सदर रेल्वे गाडी सुरु झालीच होती त्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार ब.नं. 100 दिनेश विश्वनाथ बडगुजर हे आपले प्लॅटफॉर्मवरील काम आटोपुन परत जात होते. सदर रेल्वे गाडीने वेग घेतला असतांनाच अचानक सौ सुनिता पांडुरंग बेडीस अंदाजे वय वर्षे 50 ही महिला तिचे पती सोबत गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत असतांना त्या महिलेचा रेल्वेच्या पाय-यांवरुन पाय निसटल्याने ती रेल्वेच्या व प्लॅटफॉर्मच्या मधील भागात खाली पडत असतांनाच दिनेश बडगुजर यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखुन आपला जीव धोक्यात घालुन सदर महिलेला प्लॅटफॉर्मवर ओढुन महिलेचा प्राण वाचविला आहे. अशा रितीने दिनेश बडगुजर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सदर महिलेचा प्राण वाचविला असून सदर महिलेला पुर्नजीवन प्राप्त झाले आहे. सदर घटनेनंतर जळगाव चे पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री विठ्ठल ससे हे देखील सदर ठिकाणी तात्काळ पोहचले होते. सदर घटना त्यांनी प्रत्यक्ष बघीतली असल्याने त्यांनी तात्काळ सदर घटनेचे आरपीएफ जळगाव यांचे कडुन प्लॅटफॉर्म क्र 2 चे CCTV फुटेज मागवून खात्री केली आहे.