परभणी – गोदाकाठच्या रस्ता दुरुस्तीसाठी सोनपेठ तालुक्यातील सात गावांनी घेतलेल्या महापंचायतीत मतदानावर बहिष्कार व नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. रस्त्याच्याच प्रश्नावर जिंतूर तालुक्यातील घुसकवडी या गावानेही बहिष्काराचा इशारा दिला आहे. तर परभणी तालुक्यातील दोन गावांनी स्वतंत्र मतदान केंद्राच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. एकूण 10 गावांनी आपल्या-सोयीसुविधांसाठी दिलेल्या या इशार्याने निवडणूक विभागाला या ग्रामस्थांची मनधरणी करावी लागणार आहे.
सोनपेठ तालुक्यातील गोदावरीकाठच्या अकरा गावांचा रस्त्यांचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. थोडा पाऊस पडला की सात गावांचा जगाशी असणारा संपर्क तुटतो. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतात. नुकत्याच झालेल्या पावसाने गोदाकाठच्या गावांना जोडणारे दोन्हीही रस्ते ठप्प झाल्याने या गावातील विद्यार्थ्यांची शाळा आठ दिवस बंद होती. या गावात झालेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांना जाता आले नाही. गरोदर स्त्रिया व रुग्णांचे मोठे हाल झाले. यामुळे त्रस्त झालेल्या गोदाकाठच्या नागरिकांनी गुरुवारी थडी उक्कडगाव येथे सात गावांतील नागरिकांची महापंचयात आयोजित केली होती.
या महापंचायतीत गोदाकाठच्या गावांनी निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकून मतदान न करण्याचे ठरवले आहे. तसेच शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकार्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याबाबत सोमवारी सोनपेठ येथे प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरले आहे. प्रत्येक गावात गावबंदीचा व निवडणूक बहिष्कार बाबत फलक लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
दोन गावांची मतदान केंद्रांची मागणी- परभणी तालुक्यातील मोहापुरी व गव्हा या दोन गावांनी स्वतंत्र मतदार केंद्र न दिल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या दोन गावामध्ये 500 मतदार असून गावांना 8 किमी आंतरावर असलेल्या पान्हेरा या गावातील मतदान केंद्राशी जोडलेेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी या दोन्ही गावांना स्वतंत्र मतदान केंद्र आहे. परंतु लोकसभा व विधानसभेला हे गाव 8 किमी वरील पान्हेराशी जोडलेले आहे. परिणामी मतदानाची टक्केवारी 50 टक्केपेक्षाही खाली येते. या पार्श्वभुमीवर या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष शांती स्वरूप जाधव, शहर जिल्हाध्यक्ष किरण तळेकर यांनी केली आहे.
भुसकवडीचाही रस्त्याचा प्रश्न- जिंतूर तालुक्यातील भुसकवडी ग्रामस्थांनी रस्त्याच्याच दुरावस्थेवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या गावाला रस्ताच नाही. कच्चा रस्त्यावरूनच दळणवळण करावे लागते. प्रत्येक निवडणुकीला आश्वासन दिले जाते. आमदारांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. मागील सात ते आठ निवडणुकांपासून प्रशासनाकडेही रस्त्याची मागणी करूनही या प्रश्नाकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.