जळगाव:– गावांकडून सध्या रोजगार आणि अन्य कारणांमुळे शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. हे रोखण्यासाठी गावांना आर्थिक सक्षम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी गावात उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा, नैसर्गिक स्त्रोतांचा व शासनांच्या योजनांची सांगड घालून आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणी व उपजिवीका या विषयांवर सादरीकरण करित गावांना आर्थिक सक्षम करण्याचा निर्धार सरपंचांनी केला.
गांधी रिसर्च फाऊंडेशन व पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) यांच्यातर्फे आयोजीत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत थेट निवडून आलेल्या सरपंचांचे क्षमता बांधणीचे प्रशिक्षण शिबीराचा आज समारोप झाला. याप्रसंगी सरपंचांचे पाच गट करण्यात आले होते. यात आरोग्य, शिक्षण, उपजिविका, स्वच्छता, पाणी या विषयांवर सरपंचांनी सादरीकरण केले. गावपातळीवर प्रत्यक्ष काम करित असताना एकत्रित प्रशासकिय यंत्रणेतील अडचणी, त्या दूर करण्यासाठी करावयाचे प्रयत्नांची जाणीव प्रशिक्षण शिबीरात झाल्याच्या भावना सरपंचांनी व्यक्त केल्यात. गावातील विकासात सरपंचांची भूमिका प्रशिक्षणातील ज्ञानामुळे कळाल्याने गावाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल्याचेही सरपंचांनी सांगितले.
दरम्यान यशदाच्या प्रशिक्षक डॉ. उषा साळूंखे यांनी ग्रामपंचायत उत्पन्नाच्या बाबी, ग्रामपंचायत दप्तर (1 ते 33) नमुने, शासनाच्या महत्त्वाच्या योजना यावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी सरपंचाकडे असलेल्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकत शासकीय कर्मचाऱ्यांकडून समन्वयातून कामे करून घेण्याचा सल्ला दिला. यासाठी सरपंचांनी आपल्या ज्ञानात भर टाकली पाहिजे जेणे करून नेतृत्व कौशल्य विकसीत होईल. सरपंच या नात्याने विविध योजनांचा उपयोग करून शिक्षण व अन्य सुधारणा कशा करता येईल, याची माध्यमे शोधून काढण्याचेही आवाहन डॉ. उषा साळूंखे यांनी केले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक निलेश पाटील, नितीन चोपडा, योगेश पाटील, अविनाश अहिरे यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी व यशदाचे सहकारी सहकार्य करीत आहेत. सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले.