मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे एका वक्तव्यामुळे वादात आले. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना त्यांनी हेमा मालिनी यांच्या गालाशी केली. आता यावर थेट हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.
नेमक्या काय म्हणाल्या हेमा मालिनी ?
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हेमा मालिनी म्हणाल्या, महिलांबाबत एका जबाबदार व्यक्तीने किंवा मंत्र्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही, असं हेमा मालिनी म्हणाल्या. ‘मला माझ्या गालांची आता अधिक काळजी घेतली पाहिजे, असं गुलाबराव पाटलांच्या वक्तव्य आधी हेमा मालिनी हसल्या म्हणाल्या. पण चेष्टेचा भाग सोडा. आपल्या गालांबाबत यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी काही वर्षांपूर्वी वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून अशा प्रकारच्या वक्तव्यांचा ट्रेंड सुरू आहे. बहुतेक सर्वच जण अशा प्रकारे सहज बोलून जातात.
अशाच प्रकारे ते ही (गुलाबराव पाटील) बोलले असतील. पण हे अतिशय चुकीचं आहे. सामान्य माणूस बोलत असेल तर त्यावर फार काही करू शकत नाही. पण एखादा बडा नेता आणि मंत्री असं बोलत असेल तर ते अजिबात योग्य नाही. कुठल्याही महिलेची तुलना किंवा तिच्या नावाचा उपयोग वक्तव्यांसाठी केला जाऊ नये, असं हेमा मालिनी म्हणाल्या.