जळगाव : तब्बल दीड वर्षानतंर झालेल्या जळगाव महापालिकेच्या पहिल्याच महासभेत आज उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात हमरीतुमरी झाली. या वादाची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे. उमहपौर पाटील यांना व्यासपीठावर बसू देण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच सभेत तणाव निर्माण झाला.
जळगाव महापालिकेची दीड वर्षानतंर बुधवारी ऑफलाइन महासभा झाली. यावेळी व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुळकर्णी व नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अभिनंदनाचे व श्रध्दांजलीचे प्रस्ताव झाल्यानतंर सभेत सुरुवात झाली.
साडेअकरा वाजता सभेस सुरुवात होताच भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या व्यासपीठावर बसण्याला हरकत घेतली. तसेच उपमहापौर सभागृहात कोणत्या अधिकाराने ? ; त्यांना सभागृहाबाहेर काढा अशी मागणी केली. तसेच कैलास सोनवणे यांनी उपमहापौर पाटील यांना उद्देशून तोडपाणी करण्यासाठी व्यासपीठावर बसले का? तू तुझे हे छपरी धंदे बंद कर?, अशा शब्दांत चिखलफेक करण्यात आली.
उपमहापौर देखील संतापून ‘तुम्ही तुमचे बघा, तुम्ही सात वर्षांत काय धंदे केले ते सिद्ध करतो, असे म्हटले. तुम्हाला पालिकेच्या मोठ्या घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, तुम्हाला सभागृहात बसण्याचा तरी नैतिक अधिकार आहे का? असा टोलाही उपहामौपर पाटील यांनी कैलास सोनवणे यांना लगावला. याच मुद्द्यावरून शब्दाला शब्द वाढत गेला आणि सोनवणे व उमहापौर पाटील एकेरीवर आले.