नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यावर हल्ला करण्यासाठी विशेष गट तयार करण्याचं काम पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठीच हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयमधील एक ’मेजर’ या हल्ल्यासाठी ’जैश’ची मदत करत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिली.
’जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील पाकिस्तानी दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याचा म्होरक्या यांच्यातील लेखी संवादाची माहिती एका विदेशी गुप्तचर संस्थेच्या हाती लागली. त्याच विदेशी गुप्तचर संस्थेनं ही माहिती भारतीय गुप्तचर अधिकार्यांना दिली. विदेशी संस्थेकडून मिळालेली माहिती ’टाइम्स ऑफ इंडिया’च्या हाती लागली असून, सप्टेंबरमध्ये एका मोठ्या हल्ल्याची योजना आखल्याचा त्यात उल्लेख आहे.
30 शहरांमध्ये अलर्ट- मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, कानपूर, गांधीनगर, लखनऊसह एकूण 30 शहरांमध्ये पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांच्याही सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकच्या योजनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच ते पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.