मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांनी बोलायला हवे. एसटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती समजावून घेण्याऐवजी अरेरावी काय करताय?, अरेरावी कराल तर ते तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून नाशिक दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे.
मध्यन्तरीच्या काळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांच्यात व माझ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावरून चर्चा झाली. यावेळी मी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्यानं पत्र लिहिलं नाही, असं सांगितलं. एसटी चालवण्यासाठी खासगीकरण करण्याऐवजी प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी नेमण्याऐवजी दम देण्याचं काम केलं जात आहे. एक लाख कर्मचारी आहेत, त्यांचं ऐकल नाही तर ते अंगावर येतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.















