
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारांप्रकरणी तुरुंगात असले तरी त्यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरता यावा याकरिता तात्पुरता जामीन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्यानुसार त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका केली आहे.
कदम यांनी अॅड. नितीन प्रधान यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. अॅड. प्रधान यांनी मंगळवारी न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला याचिकेचा उद्देश सांगितला. मात्र, ‘हा विषय योग्य खंडपीठासमोर मांडावा आणि त्यासंदर्भात मुख्य न्यायमूर्तींसमोर जावे’, असे सुचवून या खंडपीठाने सुनावणीस नकार दिला.
‘कदम हे या महामंडळावर अध्यक्ष असताना सुमारे ४५० कोटींचा घोटाळा करण्यात आला’, असा आरोप ठेवत गुन्हे अन्वेषण शाखेने (सीआयडी) त्यांच्याविरुद्ध तब्बल दोन हजार पानी आरोपपत्र ठेवले आहे. या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात वारंवार प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे ते २०१५पासून कोठडीत आहेत.