सरकारमान्य रेशन दुकानातून आता खुल्या बाजारातील वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होणार असून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या विक्रीला परवानगी दिली आहे.या निर्णयामुळे रेशनच्या दुकानातून ग्राहकांना इतर वस्तू खरेदी करता येणारं आहे.
रेशन दुकानातून आता कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. राज्यातील ५२ हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. आतापर्यंत गहू, तांदूळ, तेल आणि साखर या गोष्टी खरेदी करता येत मात्र आता अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं खुल्या बाजारातील वस्तू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेशन दुकानातून विक्री होणाऱ्या खुल्या बाजारातील वस्तू विक्रीपोटीचे कमीशन यासाठी रेशन दुकानदारांनी वितरकांशी परस्पर संपर्क साधायचा आहे. या व्यवहारा संबंधित कंपनी त्यांचे घाऊक आणि किरकोळ वितरक आणि रेशन दुकानदारांमध्ये असतील. यामध्ये सरकारच्या कुठल्याच प्रकारचा सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नसल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं काढलेल्या मान्यता आदेशात नमूद केले आहे.