मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांच्या आरोपांचं खंडन करत इशारा दिला आहे.
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत. त्याबाबतचे पुरावे मी तुमच्यासमोर सादर करणारच आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही मी पुरावे देणार आहे. नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बाँम्बच फोडणार आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोतील व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं. मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला, आता लक्षात ठेवावं आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेल. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांनी माझ्याशी बोलू नये. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. पण शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहे. दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली. त्याला अंतापर्यंत न्यावे लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
नीरज गुंडे हे तुमचे सचिन वाझे आहेत? असा आरोप नवाब मलिक यांनी तुमच्यावर केलाय. या प्रश्नावर बोलतान फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात नीरज गुंडे उत्तर देतील. पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेसंदर्भात आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे. नीरज गुंडे यांच्याशी संबध आहेतच. पण मी जेवढे वेळा नीरज गुंडेच्या घरी गेलो, त्यापेक्षा जास्तवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही कालावधीत गेले आहेत. किंवा मी जेवढेवेळा मातोश्रीवर गेलोय, त्यापेक्षा जास्तवेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेले आहेत. कदाचीत माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबध असावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.