दिवाळी सणाच्या तोंडावर एक मॅसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असून गृह मंत्रालयाचा दाखला देत पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठविले आहेत. दमा आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतील असे विषारी वायू या फटक्यांमध्ये असल्यामुळे ते न खरेदी करण्याचे आवाहन या व्हायरल मॅसेजच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
व्हायरल मॅसेज मध्ये गृह मंत्रालयातील वरिष्ठ तपास अधिकारी विश्वजित मुखर्जी यांच्या नावाने हा मॅसेज व्हायरल होतांना दिसत असून त्यात म्हटलं आहेकी, “गुप्तचरानुसार, पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताकडून बदला घेण्याची मागणी चीनकडे केली आहे. भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके भरले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साईड वायूला विषारी आहेत. याशिवाय, भारतात, डोळ्यांच्या आजारांच्या विकासासाठी विशेष प्रकाश सजावटीचे दिवे देखील तयार केले जात आहेत. पारो मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे, कृपया या दिवाळीत जागरूक रहा आणि या चायनीज उत्पादनांचा वापर करू नका. हा संदेश सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा.” असं म्हटलं आहे.
या मॅसेजच्या सत्यतेविषयी अधिक माहिती घेतली असता गृहमंत्रालयाच्या कुठल्याच मीडिया वेबसाईटवर असे कुठलेच आवाहन आढळून आलेले नाही अथवा या संदर्भातील कुठलेच नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले दिसून आले नाही.गृह मंत्रालयाच्या वेबसाईट व ट्विटर हँडलवरदेखील असा काही मॅसेज किंवा या विषयी अधिकृत असे काही आवाहन आढळून आले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेला तो मॅसेज ‘फेक’ असल्याचं समोर आलं आहे.