जळगाव : राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे आज शहरातील शिवाजी पुतळ्यासमोर दरेकरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेता भाजपचे प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबद्दल वक्तव्य करताना हा पक्ष रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे. अशाप्रकारे पक्षाचा व महिलांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत जळगाव राष्ट्रवादी कॉग्रेंस महिला आघाडीतर्फे शिवाजी पुतळ्यासमोर दरेकरांच्या प्रतिमेवर शाई फेकुन तसेच जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला आघाडीने प्रवीण दरेकर मुर्दाबाद..भाजपचा निषेध असो, महिलांचा अपमान करणार्यांचा निषेध असो.. दरेकरांचे करायचे काय; खाली डोकं वरती पाय.. अशा पध्दतीने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, कल्पना अहिरे, मिनाक्षी चव्हाण, निरिक्षक शालीनी सोनवणे आदींचा सहभाग होता.