जामनेर : तालुक्यातील २० ते २५ गावांना मागील दोन दिवसात चक्रीवादळासह झालेल्या अतिवृष्टीने तडाखा दिला. यात तालुक्यातील तालुक्यातील सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. २५० घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील पशुधनाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, आज बुधवारी सकाळपासून भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली.
पाहणी केल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, कापूस, मका यासारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात यापूर्वीही यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात चक्रीवादळामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
त्यावेळीही पंचनामे झाले. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक दमडीही मदत मिळालेली नाही. मागच्याच आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्या ठिकाणी मदतीची घोषणा झाली. पण नुकसानग्रस्तांना काहीही मिळालेले नाही. राज्य सरकारने किमान आता तरी शेतकरी आणि नुकसानग्रस्त लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.