आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर
शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी) दि. 28 – राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, 30 जुलै, 2021 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत कौशल्यातून रोजगाराकडे (आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात श्री. नितीन जाधव, कौशल्य अभियान अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, दुपारी 3.00 ते 3.25 या वेळेत, श्री. श्रीपाद दिगंबर आमले, फाऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर, आस्थापना ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी, ओ.पी.सी. प्रा. लि. पुणे हे दुपारी 3.25 ते 3.50 या वेळेत, डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती हे दुपारी ३.५० ते ४.१५ या वेळेत तर डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिध्द प्लास्टिक सर्जन, लातूर दुपारी ४.१५ ते ४.४० या वेळेत आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार असून दुपारी 4.40 ते 5.00 वाजेपर्यंत पश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.
या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.
फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A
00000
सैनिक मुलींचे वसतिगृहातील
कंत्राटी चौकीदार पदासाठी 5 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, (प्रतिनिधी) दि. 28 – सैनिक मुलींचे वसतीगृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे असून या वसतिगृहात चौकीदार पद कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. सदरचे पद हे 24 तास कामाचे असून दरमहा 8911 रुपये इतके एकत्रित मानधन देण्यात येईल. या पदाकरीता 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माजी सैनिक तसेच इतर नागरीक यांनी 5 ऑगस्ट, 2021 च्या आत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येऊन अर्ज सादर करावा.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा
धनगर समाजातील महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, (प्रतिनिधी) दि. 28 – बहुजन कल्याण विभागाच्या 6 सप्टेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांना देण्यात येणार आहे.
धनगर समाजातील महिला नवउद्योजकांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येईल.धनगर महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग आधार नोंदणीपत्र, जात प्रमाणपत्र व बॅकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील महिला उद्योजकांना आवाहन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठीही स्टॅण्ड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे.
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील महिला नवउद्योजक यांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.या अटींची पूर्तता करीत असलेल्या महिला उद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरण्यासाठी
29 जुलै रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी) दि. 28 – सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैशाली हिंगे यांनी केले आहे.
आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज सादर केल्यानंतर तीन ते पाच महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समितीकडून निर्णय घेतला जातो. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला पुरेसा अवधी मिळणे आवश्यक असते. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्याना तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत.
ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचेही श्रीमती हिंगे यांनी म्हटले आहे.
गुरुवारी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यरत आहे. इयत्ता 12 वी विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी मागासप्रवर्गातुन नियुक्त असणारे अधिकारी/कर्मचारी, मागास प्रवर्गातून निवडणुक लढविणारे उमेदवार इत्यादीना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासन ऑनलाईन सुविधा 1 ऑगस्ट 2020 सुरु करीत आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता मोफत मार्गदर्शन शिबिर 29 जुलै, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता गुगल झुम ॲपवर होणार असून याचा मिटींग आयडी 88315482834 असा असून पासवर्ड OcU३Qg हा आहे.
यावेळी अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पाईट प्रेझेटेशनव्दारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादीनी या बेबीनारमध्ये सहभागी होवुन मार्गदर्शन घ्यावे. असे आवाहन अध्यक्ष प्रकाश वायचळ, उपायुक्त तथा सदस्य श्रीमती वैशाली हिंगे व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बी. यु. खरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे
00000
अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागासाठी
शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, (प्रतिनिधी) दि. 28 – केंद्रिय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रिय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्यावतीने त्या त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात.
या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविलर जातो. राज्य शासनाकडून या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्याच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सचिवालय जिमखान्यावर सोपविलेली आहे.
तरी जळगाव जिल्ह्यातील ज्या शासकीय खेळाडू कर्मचाऱ्यांना टेबल टेनिस, बॅडमिन्टन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रिज, कॅरम, बुध्दिबळ, ॲथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावर लिफ्टींग, शरीरसौष्टव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव यांच्याकडून विहित मुदतीत प्राप्त करुन घ्यावेत.
प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे आवेदनपत्र भरुन ते कार्यालय प्रमुख/ विभागप्रमुख यांच्या मान्यतेने एक आगाऊ प्रतिसह व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, 6, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई यांच्याकडे 31 नोव्हेंबर, 2021 पर्यंत टपालाव्दारे किंवा व्यक्तीश: तसेच sachivalayagym@rediffirmail.com या ईमेलवर पाठवावीत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000