जळगाव,(प्रतिनिधी)– गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीने ग्राहकांचा विद्युत पुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता कापण्याचा धडाका लावला आहे. धरणगाव तालुक्यातच मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कापण्यात येत आहेत. कोरोनाची परिस्थिती तसेच कोरोना काळातील विज बिल कमी होईल अशी आशा लोकांना होती . यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिल भरले नाहीत. आणि आता थकबाकी वसुलीची मोहीम राबविली जात असतांना अचानक पणे विद्युत कनेक्शन कापण्यात येत आहेत.
यासंदर्भात स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली. पालकमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत आज बुधवार रोजी धरणगाव येथे विद्युत विभागाचे अधिकारी,कार्यकारी अभियंता आर एस पवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.जी.रेवतकर व धरणगांव अर्बन युनिट चे कनिष्ठ अभियंता एम.बी.धोटे यांची बैठक बोलाविली. यावेळी कोणत्याही ग्राहकाचे विद्युत कनेक्शन अचानकपणे कापु नका असे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले.
यावेळी लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी.एम.पाटील सर, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरपालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी पी.एम.पाटील यांची सकल मराठा समाजाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सदर बैठकीत शिवसैनिकांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अचानक पणे विद्युत विभागाचे अधिकारी, कर्मचारी घरगुती व व्यापाऱ्यांचे विद्युत कनेक्शन कापत आहेत. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले. सध्याच्या बिकट परिस्थितीत नागरिकांना विविध समस्या निर्माण झाल्या असतांना महावितरण कंपनीच्या कठोर भूमिकेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रसंगी धरणगांव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस पवार यांनी थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून धरणगाव ची मागील वर्षी असलेली १० लाखाची थकबाकी यावर्षी सव्वा कोटी रुपयापर्यंत गेली असल्याचे सांगितले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी कोणत्याही ग्राहकांचे विद्युत कनेक्शन एका एकी कापु नका व बिल भरण्यासाठी ग्राहकाला संधी द्या व तीन टप्प्यात 40 :30 :30 याप्रमाणे टप्पे करून बिलाची वसुली करा.
तसेच धरणगांव पाणी पुरवठा चा एक्स्प्रेस फिटर असुन तेथे नेहमी नेहमी विज पुरवठा खंडित होत असुन त्यामुळे गावातील पाणी पुरवठा उशिराने होत असतो त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत सदर ठिकाणी विज पुरवठा खंडित होता कामा नये असे आदेश याप्रसंगी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.