■महिला प्रवाश्यांची मोठी गैरसोय
■दुरुस्तीची मागणी
चुंचाळे ता.यावल (वार्ताहर) साकळी येथील बसस्टॅन्डची फार मोठया प्रमाणात पडझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे.तर आता हे बसस्टँड शेवटची घटिका मोजत असून ते बसस्टँड नुसते नावालाच उरले आहे. या बस स्टॅन्ड मध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला प्रवाशांना कुठे बसावे ?असा प्रश्न पडत असतो.
याठिकाणी बसायला जागा नसल्याने महिला प्रवाशां सह सर्व प्रवाशांची फार मोठी गैरसोय होत त्यांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधींनी या गैरसोयीकडे लक्ष देऊन बसस्टॅन्ड दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा व बस स्टॅन्ड दुरुस्त करण्याची लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी साकळी सह परिसरातील प्रवासी नागरिक करीत आहे.
याबाबत सविस्तर असे की, यावल तालुक्यातील मोठ्या गावांपैकी साकळी हे गाव एक आहे तसेच साकळी गावाला परिसरातील जवळपास सात ते आठ खेडे सुद्धा लागून आहे. साकळी सह परिसरातील नागरिकांना दुरच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी साकळी बस स्टॅन्ड वर यावे लागते व या ठिकाणी थांबून बसची वाट पाहवी लागते.मात्र या प्रवाशांना बसण्यासाठी या ठिकाणी फार जुन्या बांधकामाचे बस स्टॅन्ड आहे.
मात्र आता या बस स्टँड मधील बसण्याच्या जागेवरील सर्व फरशा निघालेल्या असून या ठिकाणी बसायला शोधूनही जागा सापडत नाही तसेच आजूबाजूच्या भिंतींची सुद्धा पडझड झालेली असून छप्पर सुद्धा तुटलेले आहे.
पावसात तर याठिकाणी बस स्टॅन्ड मध्ये पाणीच पाणी झालेले असते.तर उन्हाळ्यात उन्ह सहन करावे लागते. एकूणच या बस स्टँडच्या गंभीर व धोकेदायक अशा दुरवस्थेमुळे बस स्टँडच्या परिसरात उभे राहणाऱ्या प्रवासी नागरिकांच्या जीवासही धोका संभवू शकतो. त्याचप्रमाणे बसची तासन्तास वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना फार मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे
तरी सदर बसस्टँडच्या गैरसोयीकडे संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर बसस्टँडची लवकरात-लवकर दुरुस्ती करण्यात यावी व सुसज्ज असे बस स्टॅन्ड प्रवाशी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी साकळीसह परिसरातील प्रवासी नागरिक करीत आहे.