मुंबई दि २० : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांचा लेटर बॉम्ब ने राजकीय वर्तुळात धमाका….
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठ पानाचे पत्र देऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून हे पत्र ‘लेटर बॉम्ब’ ठरल्याने राजकीय वर्तुळात धमाका झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. एवढा स्फ़ोटक व गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन खुलासा केला असून त्यांनी म्हटलं आहे की, मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.