जळगाव : बांधकाम क्षेत्रातील नव्या कायद्यात सुटसूटीतपणा आल्याने आर्किटेक्ट मंडळींना आपले कौशल्य पूर्णपणे वापरता येणार आहे. सामान्य माणसाचा विचार करून कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील दर देखील कमी असून सामान्यांना परवडेल असे झाले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल अशा योजना नवीन कायद्यात आखण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन माजी शहर नियोजन सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी केले.
शहरात कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या संघटनेतर्फे बांधकाम व्यावसायिकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा मंगळवार दि. १९ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी शहर नियोजन सहसंचालक प्रकाश भुक्ते, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, क्रेडाई संस्थेचे राज्याचे सहसचिव अनिश शहा, क्रेडाई संस्थेचे जिल्हाध्यक्ष निर्णय चौधरी, साचव ऍड. पुष्कर नेहेते उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करीत कार्यशाळेचे उदघाटन केले. प्रस्तावनेत अनिश शहा यांनी, शासनाशी प्रत्येक कायद्यावर संवाद साधणे महत्वाचे आहे. रेरा कायदा हा सकारात्मक पद्धतीने तयार झाला पाहिजे. बांधकाम क्षेत्रातील कायदे सोप्या पद्धतीने समजावे म्हणून क्रेडाई प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यानंतर क्रेडाई संघटनेचे राज्याध्यक्ष राजीव पारेख यांचा संदेश प्रसारित करण्यात आला.
प्रसंगी, देशात रोजगार पुरविण्याचे काम करण्यात बांधकाम क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो. बांधकाम व्यवसायात सर्वत्र एकसूत्रीपणा सारखा हवा. बांधकाम व्यवसायात सुलभता येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.
कार्यशाळेसाठी कोरोना नियंत्रणासाठीचे नियम पाळून पूर्ण सभागृहात जिल्हाभरातून सुमारे ४०० सरकारी अधिकारी, अभियंते, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद सहभागी झाले होते. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी तर आभार धनंजय जकातदार यांनी केले. यावेळी पाचोराचे अध्यक्ष संजय कुमावत, भुसावळचे अध्यक्ष चेतन पाटील, चाळीसगावचे अध्यक्ष सुशील जैन उपस्थित होते. कार्यशाळेसाठी शहर नियोजनचे सहसंचालक चंद्रकांत निकम व संजय खापर्डे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर आदींनी सहकार्य केले.
बांधकाम कायद्यांची अपर जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती
अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी कार्यशाळेत शेत जमीन- रहिवासी व औद्योगिक आयोजनार्थ अकृषिक वापरासाठी असणारे कायदे व नियमबद्दल माहिती सांगितली. विकासाच्या योजना, नियोजन प्राधिकरण, प्रादेशिक योजना, जमीन भोगवटादार वर्ग, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा याबाबत सोप्या पद्धतीने उपस्थिताना महाजन यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, बांधकाम क्षेत्रातील शासकीय पातळीवर होणाऱ्या विविध कार्यवाही जलदगतीने व्हाव्यात याकरिता नवनवीन बदल होत आहेत . बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या सुधारणा याबाबत व्यावसायिकांनी वेळोवेळी माहिती करून घ्यायला हवी असे सांगत प्रवीण महाजन यांनी काही अधिनियमाची माहिती, नजराणा आदींची महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच विविध कायद्यात झालेले बदल याविषयी सविस्तर माहिती पीपीटीद्वारा सांगितली.
नवीन कायद्यांविषयी प्रकाश भुक्ते यांचे मार्गदर्शन
शहर नियोजन, बांधकाम क्षेत्राशी निगडित नवीन कायदे याविषयी माजी शहर नियोजन सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी सहभागींना माहिती दिली. राज्यात अनेक लॉन, झोन आहेत त्यांचे एकत्रीकरण करणे हे गरजेचे आहे. ऐतिहासिक विविध वारसा आपल्या राज्याला मिळालाय. ते जतन करणे देखील महत्वाचे आहे. यात शहरातील रस्त्यांसाठी मार्गदर्शिकादेखील सांगण्यात आली आहे, असेही भुक्ते यांनी सांगितले. कायद्यातील १५ भाग त्यांनी सोप्या भाषेत पीपीटीद्वारे समजवून सांगितले. कार्यशाळेत प्रश्नोत्तराद्वारे सहभागींनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात देखील वक्त्यांकडून माहिती जाणून घेतली.