मुंबई, राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या स्थितीत मुख्यमंत्री राज्यातील तमाम भगिनींना या भाऊबीजेला भयमुक्त व भीतीमुक्त महाराष्ट्राची भेट देणार का, असा सवाल भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. चित्राताई वाघ यांनी सांगितले की, राज्यात महिलांवर अत्याचार होण्याची घटना दररोज घडते आहे. महिलांचे डोळे फोडले जाताहेत. महिलांना जिवंत जाळलं जात आहे. लहानग्या मुलींवर बलात्कार/सामुहिक बलात्कार होताहेत. छेडछाडीला सामोरं जावं लागत आहे आणि हे रोज रोज रोज होत आहे.
राज्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती महाविकास आघाडीने वाईट करून ठेवली आहे. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही फक्त टेप वाजवू नका, त्याची जबाबदारी खरोखर निभवावी. अत्याचाराच्या घटना वाढत असून महिलांच्या सुरक्षेसाठी काय करणार ते सांगा, असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत सरकारला निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र सरकारला अजून जाग येत नाही. दिशा कायदा अजून लागू होत नाही.