जळगाव, (प्रतिनिधी): भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त ‘फिक्स’ झाल्यासारखा असतांना अद्यापही एकनाथराव खडसे व राष्ट्रवादी कडून पक्ष प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा झाली नसल्याने नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सस्पेन्स कायम आहे.
दरम्यान नेहमीप्रमणे एकनाथराव खडसे हे आपल्या सोशल मीडिया फेसबुक पेज वर व ट्विटर वर केल्या पोस्ट वर भाजपच्या ‘कमळ’ चिन्ह नमूद आहे. यामुळे नाथाभाऊ राष्ट्रवादी प्रवेश करतील किंवा नाही याबाबत अद्यापही अनिश्चितता तर नाही ना असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे.
दोन दिवसापासून राज्यभर राष्ट्रवादी समर्थकांनी सोशल मीडियावर आपलं स्टेटस ठेवतांना ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथराव खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी मोठे उत्सुक असल्याचे दिसत आहे. असे असले तरी येत्या दोन दिवसात नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे चित्र स्पष्ट होणार आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबत राज्यभरात मोठी उत्सुकता आहे.