महाविद्यालयांची क्लासेस सोबत मिलीभगत..?
जळगाव,(विशेष प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काही कोटा पॅटर्न क्लाससेस व काही विज्ञान शाखेचे महाविद्याल प्रशासन मिलीभगत करून विज्ञान शाखेचे महाविद्यालय ‘वर्ग’ न भरवताच किंवा काही विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण सूट देऊन ‘शाळा’ भरवत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील उच्च पदस्थ असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दैनिक नजरकैद’ शी बोलतांना ही माहिती दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अभियांत्रीकी वैद्यकीय क्षेत्रात “कोटा पॅटर्न”प्रसिद्ध असल्याने 11वी व 12 वी चे विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या परीक्षांची पूर्व तयारी म्हणून “कोटा पॅटर्न” कडे आकर्षित होत असल्याचा गैरफायदा घेत काही कोटा क्लासेस चालक व काही विज्ञान शाखेचे प्रशासन आपसात सेटिंग करून महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात फक्त कागदावर हजेरी दाखवतात प्रत्यक्षात मात्र तो विद्यार्थी “कोटा पॅटर्न” ला हजर असतो. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती उत्तम असते त्या विद्यार्थ्यांना 11वी 12वी ला असतांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पूर्व तयारी म्हणून पालकही आग्रही असतात यात मात्र 11वी 12 वी कडे दुर्लक्ष होते. परंतु ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूकीची असते त्यांना महाविद्यालयाच्या शिकवणुकीवर आवलंबून राहावे लागते यामुळे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फसवणूक देखील होत आहे. याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने महाविद्यालयांना अशा “शाळा” भरवायला मूकसंमती मिळत आहे.
या निमित्ताने लॉकडाऊन काळात राज्यातील सतराशेच्या जवळपास विद्यार्थी अडकले होते.बरेचसे विद्यार्थी “कोटा पॅटर्न” साठीच राजस्थान येथील कोटा येथे जातात यातील काही विद्यार्थ्यांचे प्रवेश राज्यातील त्या त्या जिल्ह्यातील 11वी 12वी च्या वर्गात प्रवेश तर नाही याबाबत तपास होणे अपेक्षित आहे. प्रवेश असल्यास तो विद्यार्थी महाविद्यालयाच्या कागदावर हजेरी दाखवली आहे का, हजेरी दाखवली असल्यास तो विद्यार्थी कोटा येथे कसा अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या तपासातून होऊ शकतो.निःपक्षपाती चौकशी झाल्यास अनेक तथ्य देखील बाहेर येतील असा दावा शैक्षणिक क्षेत्रातील काही तज्ञांनी केला आहे.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घ्यावा या बाबत शासन निर्णय यापूर्वीच शासनाने काढला होता.या बाबत जळगाव जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी बी.जे.पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की माझ्या माहिती नुसार हा शासन निर्णय मागे घेतला आहे.या बाबत मला अधिक माहिती नाही असे सांगितल्याने हजेरीच्या शासन निर्णया बाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात हजर राहणे बंधनकारक असतांना ‘कोटा पॅटर्न’ पद्धतीने घेण्यात येत असलेल्या क्लासेसमुळे या विषयाला केराची टोपली मिळाली आहे. लॉकडाऊन काळात तब्बल सतराशे विद्यार्थी कोटा शहरात अडकले होते. या विद्यार्थ्यांनी फक्त क्लासेस लावले असतील तर ठीक आहे परंतु त्यांची हजेरी जर महाविद्यालयात भरली जात असेल तर या ‘भोंगळ’ कारभाराला जबाबदार कोण तसेच महाविद्यालय आणि क्लासेस यांच्यात ही ‘मिलीभगत तर नाही ना हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. तर शिक्षण विभाग देखील याबाबत सविस्तर माहिती देण्यात असमर्थता दर्शवित आहे.