जळगाव :- शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समध्ये कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांच्या महागड्या जीन्स आणि शर्ट्स लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खान्देश कॉम्प्लेक्समध्ये जावेद फारुख खान यांच्या मालकीचे फ्रेंड्स मेन्स वेअर नावाने कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शटरचे कुलूप तोडून एका बाजूने शटर वर उचकावीत दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातून २८ आणि ३२ साईजच्या ३० जीन्स पॅन्ट व एम साईजचे ४० शर्ट चोरून नेले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी सुधीर साळवे आणि रतन गिते यांनी पाहणी केली. याबाबत शार पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .