विविध व्यवसायांसाठी लागणारे कौशल्य विकसित करणे काळाची गरज – प्रा. सुरेश पांडे
जळगाव – विद्यार्थ्यांना जर आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच आवश्यक जीवन कौशल्य असणे फार महत्वपूर्ण आहे. यश मिळविण्यासाठी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊन संभाषण कौशल्य, मुलाखत कौशल्य, व्यावसाईक प्रगती, कोणत्याही व्यवसायासाठी लागणारे कौशल्य इत्यादींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि आत्मसात केलेल्या कौशल्यांचा त्याच्या उज्ज्वल करिअर साठी मोठ्या प्रमाणात उपयोग त्याला करता यावा या उद्देशाने सुरेश दादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना जळगाव यांच्या तर्फे कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन त्रिमूर्ती इन्स्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी, जळगाव येथे करण्यात आले. कार्यशाळेत प्रा सुरेश पांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विविध कौशल्यांवर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले कि, व्यक्तिमत्व विकास करणे अनेकांना अवघड वाटते. परंतु आपल्या दैनदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. विश्वास हिस यशाची गुरु किल्ली होय. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. तुमचे व्यक्तिमत्व जर सुधारायचे असेल तर आधी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे.
आप आपसातील परस्पर संबंधांचा विकास साठी एकमेकांशी अधिक सुसंवाद साधला पाहिजे. इतरांचा सन्मान ठेवला पाहिजे, योग्य वेळी उचित निर्णय घेण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी समयसूचकता पाळली पाहिजे. संवाद साधतांना त्यात प्रभावीपणा असावा. त्यामागे उचित हेतू असावा. विविध व्यवसायांसाठी लागणारे कौशल्य जर विकसित केले तर व्यवसायाचा विकास होईल आणि बाजार पेठेमध्ये चांगला ठसा तुमचा उमटेल.जगातील अत्यंत साधारण परिस्थितीतून आपल्या विचारांच्या आणि कौशल्यांच्या जोरावर परिस्थितीवर मत करून यश संपादन केलेल्या काही अनन्य साधारण व्यक्तींचे दाखले त्यांनी विद्यार्थ्यंना दिलेत. त्यानुसार आपणही जर मनात ठरविले आणि आपल्यातील सुप्त कौशल्यांचा विकास केला तर या जगात अशक्य असे काहीही नाही, सर्व आकाश तुमच्या पुढे ठेंगणे आहे असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एसडी सीड समन्वयक प्रवीण सोनवणे यांनी एसडी सिडच्या कार्याचा आढावा सांगितला त्यात त्यांनी सांगितले कि, एसडी सीडचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या soft skill development, वेळेचे नियोजन, इंग्रजी संभाषण कौशल्य, ध्येय निश्चिती, परीक्षेला सामोरे जातांना यासारख्या महत्वाच्या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थांमधील सुप्त कौशल्यांचा विकास होणेसाठी तसेच शिक्षक आणि पालकांसाठीसुद्धा योग्य ते समुपदेश व्हावे यासाठी शिक्षण प्रणालीमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी आणि एक यशस्वी, संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
याप्रसंगी प्राचार्य श्री. प्रांजल घोलप सर, समन्वयक प्रवीण सोनवणे तसेच सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य आणि कॉलेजचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केले आहे