जळगाव – शहरातील अष्टभुजा नगरातील रहिवासी अनिल जगन्नाथ सुर्यवंशी वय.54 यांनी त्याच्या तालुका पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या बांधकामाच्या सुरु असलेल्या साईटच्या ठिकाणी असलेल्या तळमजल्यावरील गाळ्यात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्यंत सोज्वळ व्यक्तीमत्व तसेच आर्थिक परिस्थिती चांगली अशाप्रकारे कुठलाही ताणतणाव नसतांना सुर्यंवंशी यांनी केलेली आत्महत्येचे घटना अनेकांना धक्का देणारी ठरली आहे. दरम्यान सध्यातरी आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोनवेळा फोन लावूनही प्रतिसाद न मिळाल्याने वैशाली यांनी मुलगा डॉ. कृणाल सुर्यवंशी घरी आला असता बांधकामाच्या साईड ठिकाणची जाण्यास सांगितले. कृणाल पोहचला असता त्यास वडील तळमजल्यावर गाळ्यात अनिल सुर्यवंशी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आले. त्याने तालुका पाोलिसांना माहिती दिली. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत त्यांचा मुलगाही घटनास्थळी पोहचला होता. रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. कुठल्याही प्रकारे ताणतणावात नसतांना सुर्यवंशी यांनी आत्महत्येपर्यंतचा टोकाचा निर्णय का घेतला? हा प्रश्न अनुत्तरीत असून पोलीस तपास करत आहेत.
मूळ चोपडा तालुक्यातील वढोदा येथील अनिल सुर्यवंशी हे रहिवासी आहेत. 20 वर्षापासून ते पिंप्राळा परिसरातील अष्टभुजा नगरात पत्नी वैशाली, मुलगा कृणाल व मुलगी कृतिका यांच्यासह वास्तव्यास होते. कृणालने दोन वर्षापूर्वी एमबीबीएस ही डॉक्टरची पदवी मिळविली असून तो वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो लेक्चर घेत असल्याची माहिती आहे. तर मुलगी कृतिका ही शहरातील महाविद्यालयात पदव्युत्तर विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. सुर्यवंशी यांच्या शहरातील अनेक ठिकाणी बांधकाम पूर्ण झालेले अपार्टमेंट आहेत. त्यातील काही विक्री झालेले तर काही विक्री व्हायचे आहेत. तालुका पोलीस स्टेशन समोर साईसृष्टी नावाने अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी याच ठिकाणी गेले होते.