मुंबई- दुसऱ्यांकडून माहिती घेऊन यंत्रणांना सूचना करण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यानं पाहून आणि माहिती घेऊन त्यानुसार आदेश देणं कधीही चांगलं. त्यामुळं जीएसटी भवनात लागलेल्या आगीनंतर मी स्वत: लगेचच इथं येण्याचा निर्णय घेतला,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.
मुंबईतील माझगाव इथं असलेल्या जीएसटी भवनच्या इमारतीला आज दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. एका मजल्यावर लागलेली ही आग काही वेळातच तीन मजल्यांवर पसरली. आगीची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत असलेले अजित पवार तातडीनं तिथून निघाले. घटनास्थळी येऊन त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि मीडियाला माहितीही दिली.
‘ही आग नेमकी कशामुळं लागली याची चौकशी केली जाईल,’ असं अजित पवार यांनी सांगितलं. ‘पक्षाच्या बैठकीसाठी मी मुंबईतच होतो. तिथंच मला जीएसटी भवनच्या इमारतीला आग लागल्याचा फोन आला. ही बाब मला गंभीर वाटल्यानं मी लगेचच निघाले. येतानाच मी महापालिका आयुक्तांना फोन लावला आणि अग्निशमन दलाच्या जास्तीत जास्त गाड्या पाठवण्याची विनंती केली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली व आग लागलेल्या परिसरातील वाहतूक वळविण्याबाबत चर्चा केली. आता आग बऱ्यापैकी आटोक्यात आहे. जीएसटी भवनाच्या इमारतीमध्ये सुमारे साडेतीन हजार लोक काम करतात. मात्र, कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही,’ असंही त्यांनी सांगितलं.