जळगाव – नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला प्राधान्य द्या असे सांगतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वअनुभवातुन परमीट रूमच्या व्यवसायाबाबत तरूणांना अप्रत्यक्षरित्या या व्यवसायाचा अजब सल्ला दिल्याचा प्रकार आज मुद्रा योजनेच्या मेळाव्यात घडला आणि उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या. चक्क पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या का होईना पण असा सल्ला दिल्यावर तरूण काय आदर्श घेतील अशी चर्चाही मेळाव्याच्या ठिकाणी सुरू होती.
के. सी. ई. सोसायटीच्या मैदानावर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याकरीता जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मेळाव्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, के. सी. ई. सोसायटीचे सदस्य डी. टी. पाटील मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाले पालकमंत्री….
यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पूर्वीच्याकाळी व्यवसाय कोणता निवडावा, त्यासाठी लागणारे भांडवल कोठून उभे करावे यासाठी कोणीही मार्गदर्शन करीत नसे. मात्र तशाही परिस्थीतीत अर्थाजन म्हणुन मी सुरवातीला एक हॉटेल भाड्याने घेतली. सुरवातीला शाकाहारी सुरू केले. ते काही चालेना. मग हॉटेल मांसाहारी केली. थोडी चालायला लागली. मग मांसाहारी सोबत परमीट रूमही सुरू केले. हॉटेल मांसाहारी असतांना 4 हजार रूपयांचा गल्ला होता. परमीट रूम केल्यानंतर हा गल्ला 20 हजारांवर पोहोचला. मध्यंतरी हा व्यवसाय देखिल चालत नव्हता. तेव्हा एकाने हे कर.. ते कर.. आपण राजकारणात आहोत… हा व्यवसाय चांगला नाही पण आपण नाही केला तर कोणी तरी हा व्यवसाय करणारच आहे. म्हणून मग तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांच्याकडुन परमीटचे लायसन मिळाले अशा शब्दात स्वअनुभव कथन करतांना पालकमंत्री ना. पाटील यांनी परमीट रूमच्या व्यवसायावरून तरूणांना अप्रत्यक्षरित्या अजबच सल्ला दिला. पालकमंत्र्यांच्या या अजब सल्ल्याने उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या. यावेळी परमीटच्या व्यवसायावरून त्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्याही नावाचा उल्लेख केला.
जिल्हाधिकार्यांनी केले मार्गदर्शन
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, तरुणांनी आपापल्या भागात जे व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतात त्यांची निवड करावी. उद्योग, व्यवसायासाठी बँकाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अर्थसहाय्यासाठी कोणाची अडवणूक होत असेल तर तसेही कळवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जि.प.चे सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी मानले.