नवी दिल्ली – घरगुती गॅसच्या किंमती वाढल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत भाजपला टोला हाणलाय. या फोटोमध्ये स्मृती इराणी गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर आंदोलन करताना दिसत आहेत. ‘एलपीजी सिलिंडरच्या किंमती १५० रुपयांनी वाढल्याचा विरोध करणाऱ्या या भाजपच्या सदस्यांशी मी सहमत आहे’ असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला टोला हाणलाय. RollBackHike म्हणत राहुल गांधी यांनी ही भाववाढ मागे घेण्याची मागणी केलीय.
दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेचच पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी देशात गॅस उपभोक्त्यांना जोरदार धक्का दिला. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती जवळपास १५० रुपयांनी वाढल्याचं जाहीर करण्यात आलं. ही भाववाढ लगेच लागूही झाली.
उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला स्मृती इराणी यांचा हा फोटो १ जुलै २०१० रोजीचा आहे. त्यावेळी स्मृती इराणी या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या. पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष राहुल सिन्हा यांच्यासोबत त्यांनी कोलकातामध्ये आंदोलन केलं होतं. इंधनाच्या किंमती वाढल्याच्या निर्णयाविरोधात तेव्हा त्यांनी रस्ता जाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए-२ सरकार सत्तेत होती.