अहमदाबाद – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते अहमदाबाद येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियमला (मोटेरा स्टेडियम) देखील भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते या नवनिर्मित स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे.
2015 मध्ये हे स्टेडियम पुर्णपणे पाडून पुन्हा नवीन अत्याधुनिक सुविधांसह याच्या उभारणीचे काम सुरू झाले. नवीन बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये एकाचवेळी 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रपती ट्रम्प यांनी मोदींच्या सन्मानार्थ टेक्सास येथे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 40 हजार लोक सहभागी झाले होते. आता तसाच ट्रम्प यांचा सन्मान ‘केम छो ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला 1 लाख 10 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सरदार पटेल स्टेडियमचे नवनिर्माण पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. शाह गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असतानाच या प्रोजेक्टची सुरूवात झाली होती. या नवीन स्टेडियमसाठी 700 कोटी रुपये खर्च आला आहे.
हे स्टेडियम उभारण्याची जबाबदारी लार्सन अँड टर्बो कंपनीला देण्यात आली होती. निश्चित कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पुर्ण झाला असून, आता प्रेक्षक व खेळाडूंना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळतील. पार्किंगसाठी देखील येथे मोठी सुविधा असेल. तसेच स्टेडियममध्ये आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी योग्य मार्ग तयार करण्यात आले आहेत.