जळगाव ,- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात अभ्यासासोबतच शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघावे. स्वप्नपूर्तीसाठी १२ वीनंतरच विद्यार्थ्यांने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागावे,असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी केले.
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘उडान-२०२०’ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी, ३१ रोजी सकाळी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख तर प्रमुख पाहुणे अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे व महिला व बालकल्याण अधिकारी व्ही. आय.परदेशी, संमेलनप्रमुख प्रा. डॉ. डी. एल. पाटील, तिन्ही उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. जे. पाटील, डॉ.एस. ए. गायकवाड, प्रा. डॉ. आर. बी. देशमुख आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, महाविद्यालय व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी चांगल्या कार्य करणे महत्त्वाचे आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात आपली ओळख निर्माण करायला पाहिजे, असे व्ही.आय.परदेशी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
यांचा झाला विशेष सत्कार
यावेळी गेल्या शैक्षणिक वर्षातील क्रीडा, सांस्कृतिक, विद्यापीठस्तरीय अविष्कार तसेच विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी हनुमान सुरवसे लिखित, अभिनीत व दिग्दर्शित ‘हलगी सम्राट’ नाटक महाराष्ट्रभर गाजत असून त्या टीम, संघप्रमुख प्रा.डॉ.राहुल संदाशिव यांचा आणि नाटकातील सागर भंडगर याची एका वाहिनीवरील कार्यक्रमात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसीतील विद्यार्थी सागर खलसे याने आर.डी.परेड, दिल्ली येथे सहभागाबद्दल त्याच्या आई-वडिलांचा गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. अफाक शेख यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.दिनेश पाटील,प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.एस.एम.वानखेडे, प्रा.नितीन बाविस्कर यांच्यासह सर्व तासिका प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.