जळगाव : – अमळनेर- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त जळगाव येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व अमळनेर येथील पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०८ व ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या टाऊन हॉलच्या भव्य पटांगणावर करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी ह.भ.प.प.पू. श्री प्रसाद महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने व मुख्याधिकारी तुषार नेरकर व उपशिक्षणाधिकारी एफ. ए. पठान व गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते दिंडीचे पूजन करण्यात येणार आहे.
यावेळी अनेक प्रकाशनाचे स्टॉल ग्रंथ विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी दोन्ही दिवस असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश सार्वांसाठी विनामूल्य आहे. सकाळी ११ वाजता ग्रंथोत्सव व उद्घाटन समारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण विभाग रक्षाताई खडसे भुषवणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्यासह खासदार स्मिताताई वाघ तसेच जळगाव जिल्ह्यातील विधान परिषद व विधानसभा सदस्य तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता ‘अहिराणी वैभव’ डॉ. एस के पाटील (मालेगाव दाभाडी) यांचे प्रबोधनात्मक अहिराणी प्रवचन सायंकाळी 5 वा. मयूर देशमुख (नाशिक) यांचे त्यांच्या सहकाऱ्यांसह “महाराष्ट्रातील थोर संतांच्या जीवनावरील संगीतमय भारुड” या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळच्या सत्रात प्राध्यापक महेंद्र गणपुले, नारायणगाव पूणे यांचा ‘हास्यनगरी’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारच्या सत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने ग्रंथालयाची वाटचाल’ या विषयावर जळगाव येथील महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी यांचे व्याख्यान व त्यानंतर आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहआयुक्त कपिल पवार यांचे व्याख्यान व साहित्यिक व दीर्घकाळ सेवा देणाऱ्या ग्रंथपालांचा सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व वाचक प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या पर्वणीचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, व जिल्हा ग्रंथालय संघ, अमळनेर तालुका ग्रंथालय संघ, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ यांनी केली आहे.