कोल्हापूर – महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं बदलताच भाजपचे ग्रहही फिरले आहेत. नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला असून या दोन्ही जिल्हा परिषदेत महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आली आहे. राज्यात नवी आघाडी अस्तित्वात आल्याने जिल्हास्तरावरील राजकारणात मोठ्याप्रमाणावर बदल होत असून त्याचा फटका भाजपला बसताना दिसत आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने आघाडीने भाजपकडून सत्ता खेचून आणण्यात यश मिळविले आहे. काँग्रेसचे बजरंग पाटील यांनी भाजपचे अरुण इंगवले यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. बजरंग पाटील यांना ४१ तर इंगवले यांना अवघी २४ मते मिळाली. तर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या राहुल आवाडे यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत पाटील यांना ४१ तर आवाडे यांना २४ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत भाजपच्या विजय भोजे यांनी मतदान केलं नव्हतं. तर राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर राहिले होते. मतमोजणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.