महापरिनिर्वाण दिन
विशेष संपादकीय
६ डिसेंबर १९५६ साली त्या दादरच्या सागर किनारी, ज्ञानाचा सागर चंदनाच्या चितेवर विसावला होता. सागराच्या लाटा ज्ञानसागराला आलिंगन देण्यासाठी अक्षरशः उसंड्या घेत होत्या. जणू काही त्यालाही त्या ज्ञानसूर्याला स्पर्श करून आपले जीवन पुलकित करायचे होते. एकीकडे सागर लाटा आणि दुसरीकडे लाखो अनुयायांच्या मना – मनाच्या कुंभातून अश्रूंच्या लाटा वाहत होत्या. दोन्ही लाटांना बाबासाहेब हाच संदेश देत असतील की, आज तुमच्या भावसागरातुन अश्रूंच्या लाट वाहत आहे. असे कित्येक दुःखसागर मी पिऊन टाकले आहेत. मी कधीच कुणाला ते दाखवले नाहीत. या देशाच्या आणि माझ्या समाजाच्या हितासाठी काम करीत असताना माझ्या प्रत्येक पावला गणित काट्यांचे फास होते. त्या काटेरी फासांनी मी प्रचंड घायाळ होऊन माझ्या शरीराच्या इंचा इंचावरुन रक्ताच्या चिळकांड्या निघत होत्या; पण मी तसूभरही मागे सरलो नाह. कारण मला माहित होते याच माझ्या रक्ताच्या धारांनी येथील ‘कर्मठ मने’ आणि माझ्या समाजाची ‘अस्पृश्यतेने कलंकित’ झालेली शरीरे धुवून निघतील. हाच विचार घेऊन मी जीवनात अनेक घाव मी माझ्या कुटुंबाचा विचार न करता अंगावर झेलून आज मृत्यूशय्येवर पहूडलेलो आहे.
शेवटी जाता जाता मी तुम्हाला संविधानाचे शस्त्र देऊन जात आहे. त्याच शस्त्रांच्या जोरावर तुम्ही इथल्या शोषित, पीडित, कष्टकरी जनतेला मुख्य प्रवाहात आणावे हीच माझी अंतिम इच्छा आहे….आणि बाबासाहेबांनी संवाद थांबविला असेल.
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब गेले, फक्त शरीराने गेले परंतु त्यांच्या ‘कर्तृत्वाच्या प्रकाश शलाका’ देशाला आणि इथल्या मानव समाजाला दिशा देण्याचे काम आजही करीत आहेत. त्यांच्या सरणावरुन उठलेल्या अग्नीज्वाळांनी मनामनाची स्पुलिंग चेतवली, त्यांच्या अस्थींची शस्त्र झाली, त्यांच्या शरीराच्या झालेल्या राखेच्या कणाकणातून दाही दिशा मधे आजही गगनभेदी गर्जना उठत आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आंबेडकरी समाज शिकला त्याने संघर्षही केला पण तो संघटित होऊ शकला नाही; हे शल्य आजही बाबासाहेबांचे मन तप्त निखाऱ्यांसारखे पोळून निघत असेल. परंतु शेवटी ते महासुर्य आहेत, स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाशित करण्याचं काम फक्त महा सूर्यच करीत असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही ते काम करीत आहेत.म्हणूनच महासूर्याचा अस्त हा कधीच होत नसतो.
कर्तृत्व, नेतृत्व, वकृत्व असा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तित्वात झालेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव महापुरुष आहेत की, त्यांच्यावर सर्वात जास्त काव्य, गाणी, ग्रंथ, चिंतन आणि सर्वात जास्त अनुयायी लाभलेले आहेत. आजही आंबेडकरी समाज एक वेळ मृत्यू स्वीकारेल परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना, प्रतारणा तो कधीच सहन करू शकत नाही.
डॉ. बाबासाहेब म्हणायचे की,मी प्रथमतः भारतीय आहे, आणि अंतिमतः भारतीयच आहे. म्हणून त्यांनी या देशाच्या उन्नतीसाठी दिलेले राजकीय विचार, सामाजिक विचार, आर्थिक विचार, शैक्षणिक विचार, कृषी विचार, साम्य वादावरील विचार आजही देशाला प्रेरक ठरत आहेत
डॉ. बाबासाहेबांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही,मूलभूत हक्क, अल्पसंख्यांकांचे हितरक्षण इत्यादी संबंधीचे विचार होते डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नांसंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीचे मते आपल्या अनेक लेखनातून, भाषणातून मांडली आहेत, तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. आंबेडकर यांचे राजकीय विचार घटना परिषदेच्या अधिवेशनात केलेल्या भाषणात देखील त्यांनी व्यक्त केलेले आहेत. आजही देशाच्या राज्यकारभारावर त्याचा प्रभाव जाणवतो.
*समाजवादासंबंधी विचार*:- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता, परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एक पक्ष पद्धतीचा समाजवाद मान्य नव्हता, देशातील समाजवादी व्यवस्था राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा स्वीकार करून आणि उद्योगधंद्यावर सरकारची मालकी प्रस्थापित करून समाजवादी व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते असे त्यांना वाटत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे निष्णात अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जातात, त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र हाच होता. या विषयावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून ‘भारतीय रिझर्व बँकेचा’ जन्म झालेला आहे. देशाच्या इतिहासातील पहिले सर्वात सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्याचबरोबर आंबेडकर समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षण तज्ञ, पत्रकार, उत्कृष्ट संसदपटू होतेच परंतु या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक समाज सुधारक, मानवी अधिकारांचा रक्षक, थोर विचारवंत या नात्याने केलेले त्यांचे कार्य अतुलनीय आहे.
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार*:- शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने समाजाला आपले कर्तव्य व आपल्या हक्काची जाणीव होते. अस्पृश्य समाजाला स्वाभिमानाची जाणीव व्हावी म्हणून यासाठी शिक्षणाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना नेहमीच सांगत. समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे, शिक्षण प्राप्त झाल्यावर व्यक्ती बौद्धिक दृष्टया सशक्त होतो, प्रज्ञा, शील, करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे,असे त्यांना वाटायचे.
देशाच्या उन्नतीचे असे एकही कार्य नाही की, ते डॉ. बाबासाहेबांच्या हातून घडले नाही. ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्राच्या विकासासाठी येथील दुर्बल घटकांसाठी लढत राहिले आणि ६ डिसेंबर १९५६ साली या माहासूर्याने अखेरचा श्वास घेतला. ते शरीराने आपल्यातून निघून गेलेत पण त्यांच्या ‘कर्तृत्वाच्या प्रकाशशलाका’ आजही दाही दिशा मधे अखंडपणे तडपत असून आजही भारत देशाला दिशा देण्याचे काम करीत आहे.
या विश्वाच्या क्षितीजावर उगवलेले ते एक महान सूर्यच आहे. आणि महा सूर्याचा अस्त कधीच होत नसतो!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी येथील अखिल भारतीय समाजासाठी या देशाच्या प्रगतीसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणे हेच इथल्या मानव जातीचं अंतिम ध्येय असले पाहिजे…
त्या महा सूर्याच्या प्रकाश किरणांना आम्ही कोटी कोटी अभिवादन करतो.
पो.ना. विनोद पितांबर अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव.
९८२३१३६३९९
लेखक महाराष्ट्र पोलीस दलातील साहित्यिक,कवी, समीक्षक आहेत .