शहादा – सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) बिलाचा समर्थनार्थ आज शहादा शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध हिंदू संघटना व नागरिक हजारोंच्या संख्येने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ एकवटले होते. वंदे मातरम, भारत माता की जय अशा विविध घोषणा देत जुन्या तहसील कार्यालयात तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी 72 मीटर लांब तिरंग्याने लक्ष वेधून घेतले होते.
शहरातील प्रेस मारुती मंदिराच्या परिसरातून दुपारी दोन वाजेला मोर्चास सुरुवात करण्यात आली. शिस्तबद्ध पध्दतीने निघालेल्या या मोर्चात व्यावसायिकांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करून सहभागी झाले होते. यावेळी 72 मीटर लांबीचा तिरंगा लक्ष वेधून घेत होता.
मोर्चास प्रेस मारोती मैदानापासून सुरुवात झाली. स्टेट बँक, बसस्थानक, नगरपालिका, महात्मा गांधी पुतळामार्गे जुन्या तहसील आवारासमोरील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जुन्या तहसील आवारात नायब तहसीलदार एस.आय.खुणेकर, मंडळ अधिकारी श्री.अमृतकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आ.राजेश पाडवी, राष्ट्रीय सुरक्षा मंचचे डॉ.वसंत पाटील, अजय शर्मा, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, राजेंद्र गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ. शशिकांत वाणी, डॉ.कांतीलाल टाटीया, हिरामण गवळी, भाजपा शहराध्यक्ष अतुल जयस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाडे, विजय विठ्ठल पाटील, के.डी.पाटील, शिवसेनेचे धनराज पाटील, संजय कासोदेकर, अप्पू पाटील, राकेश पाटील, सुनील सखाराम पाटील, संजय पाटील, डॉ. किशोर पाटील, समीर चोरडिया आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेनुसार संसदेमध्ये 11 डिसेंबर 2019 ला सी.ए.बी.या नावाने विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीने त्याचे सीएए कायद्यात रूपांतर करण्यात आले. हा कायदा संविधानानुसार भारतीय संसदेत मंजूर करण्यात आला. कायदा कोणत्याही जाती धर्माला विरोध करणारा नाही. हा कायदा सर्व भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा आहे. त्यामुळे या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून भारतात लागू करावा. यासाठी कायद्याला पाठिंबा दर्शवित आहोत.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर राष्ट्रीय सुरक्षा मंच व समर्थन करणार्या नागरिकांच्या सह्या आहेत.
पोलिसांचा तगडा फौजफाटा
आठ दिवसांपूर्वी या कायद्याच्या विरोधात मुस्लिम संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ निघालेल्या आजच्या मोर्चात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे आदींसह सुमारे साडेतीनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आला होता.