जळगाव,(प्रतिनिधी)- पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी जळगाव जिल्ह्यातून आली आहे,पाणीपुरी खाल्ल्याने ८० जणांना विषबाधा झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी,कमळगाव येथे घडली असून यामुळे पाणीपुरी खाणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये कमळगाव येथे सोमवारी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ८० जणांना विषबाधा झाली. मंगळवारी सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक विषबाधेच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने घटनेचा उलगडा झाला. दरम्यान, यातील अनेक गंभीर रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच जळगाव येथील जळगाव शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कमळगाव येथे चांदसणी, मितावली, पिंप्री तसेच आजूबाजूच्या खेड्यांतील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. त्या ठिकाणी अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पार्सल घरी नेले होते. यातील अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली.
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. यापैकी डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (७), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे.