लखनऊः- नागरिकत्व संशोधन कायदा विरूद्ध उत्तर प्रदेशातील अनेक शहरात झालेल्या हिंसाचारावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर शरसंधान साधले आहे. उत्तर प्रदेशात जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारात सरकारचे लोक होते. योगी आदित्यनाथ यांच्या इशाऱ्यावरून हा हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्या प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणतात, ‘ठोक देंगे आणि बदला ले लो’ अशी भाषा वापरत असेल. त्या ठिकाणचे पोलीस कसे काय निष्पक्ष काम करू शकतील, असे अखिलेश म्हणाले. आंदोलन करणाऱ्यांची संपत्ती जप्त करायची असेल तर याची सुरुवात २००७ मध्ये गोरखपूरमध्ये झालेल्या आंदोलनातून व्हायला हवी, असे म्हणत त्यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांची भाषा ही शोभनीय नाही, असे म्हणत. ज्या राज्याचा मुख्यमंत्री अशी भाषा वापरत असेल त्या राज्याची पोलीस काय कारवाई करतील, असा सवालही त्यांनी विचारला. राज्यात समाजवादी पार्टी शांततापूर्ण आंदोलन करीत आहे. जर राज्यातील परिस्थिती बिघडली असेल त्याला योगी सरकार जबाबदार आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.
अखिलेश यादव यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. अखिलेश म्हणाले, दिवाळी, रमजान, स्मशान आणि कब्रस्तान किंवा कपड्यावरून त्याची ओळख पटतेय, अशी भाषा कोणाची असू शकते, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान यांच्यावर हल्ला चढवला. संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू आहे. परंतु, ते भाजपसाठी लागू नाही आहे का?, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, (सीएए) हिंसाचारावरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामलीला मैदानावरून विरोधकांचा समाचार घेतला. देशात कुठेही डिटेंशन कॅम्प अस्तित्वात नसून देशातील कोणत्याही मुस्लिमाला नसलेल्या कॅम्पमध्ये पाठवले जाणार ही निव्वळ अफवा आहे. नागरिकता कायद्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी संबंध नसून पूर्वी आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व बहाल करण्यासाठी तो तयार करण्यात आल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे.